सोलापूर : क्षय रुग्णांची संख्या कमी करणे व क्षय रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येते. सध्या राज्यात दोन लाख 29 हजार 463 क्षयरुग्ण सक्रिय आहेत. 2023 मध्ये सात हजाराने कमी झालेली संख्या 2024 मध्ये पुन्हा सात हजाराने वाढली आहे.
राज्यासह देशातून या आजाराला हद्दपार करण्यासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. असंख्य रुग्ण नियमित उपचाराने सामान्यही झालेली आहेत. राज्यातील प्रत्येक गावापासून ते शहरस्तरावर क्षयरुग्णांचा शोध घेतला जातो. विशिष्ट काळापेक्षा अधिक दिवस जर खोकला असेल तर अशा रुग्णांच्या थुंकीची तपासणी केली जाते. त्या तपासणीच्या अहवालातून क्षयरुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याचे समुपदेशन करून उपचाराला सुरुवात केली जाते. रुग्ण शोधण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचीही मदत घेतली जाते. गावपातळीवर रुग्णाचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर महिला काम करत आहेत. या आजारावर विशिष्ट काळासाठी उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे सामान्य माणसासारखा होतो.
सन रुग्ण संख्या
2022 - 2,29,787
2023 - 2,22,243
2024 - 2,29,463
क्षयरुग्ण अनेक वेळेला माहिती लपवत असतो. मुळात या आजाराविषयी त्याच्या मनात भीती असते. क्षयरुग्णाच्या शोध मोहिमेत आशांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. रुग्ण आढळून आल्यास त्याच्या मनातील या आजाराची भीती घालवली जाते. त्यानंतर त्याच्यावर स्थितीवरून उपचाराला सुरुवात केली जाते. रुग्णांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. नियमितच्या उपचाराने पूर्णपणे रुग्ण ठणठणीत होतो.- डॉ. मीनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी