सोलापूर

शरद पवार दैवत! पण तरीही आमचा अजित पवारांनाच पाठिंबा; सोलापूरच्या कार्यकर्त्यांची भूमिका

backup backup

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरद पवार हे आमच्यासाठी दैवतच आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबरच पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्या सोबत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी रविवारी दिली.

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावेळी अजित पवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला व मिठाई वाटप करण्यात आली.

उमेश पाटील म्हणाले, देशाच्या व राज्याच्या हितासाठी भाजपसमवेत जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला आहे. देशात वेगळे सरकार व राज्यात वेगळ्या विचाराचे सरकार असे असल्यास राज्याच्या विकासात बाधा येते. देशात सध्या नरेंद्र मोदी यांच्यासमोर संपूर्ण देशात चालणारा एकही चेहरा नाही. देशाचा कारभार सतरा डोक्यांच्या आणि सतरा विचारांच्या हातात जाण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एकमुखी नेतृत्वात राहणे आवश्‍यक आहे.

यावेळी माजी शहराध्यक्ष संतोष पवार, पक्षाचे युवा अध्यक्ष जुबेर बागवान, मोहोळचे मानाजी माने आदी उपस्थित होते. यावेळी केवळ अजित पवार समर्थक उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे कट्टर समर्थक गैरहजर दिसून आले.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असे म्हणण्याला त्यांनी नकार देत राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. तेच याचे 'फाउंडर' आहेत. पाण्यात कितीही काठी मारली तरी फक्त तरंग उठतात. मात्र, पाणी वेगळे होत नाही. त्याप्रमाणे राष्ट्रवादी एकच आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT