सोलापूर

Onion price: कांद्याला दीड रुपया भाव; शेतकऱ्यांनी रोखला लिलाव

उत्पादन खर्चही निघत नसल्याने संताप

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून काद्यांला अक्षरशः मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. त्यातच मार्केट यार्डमधून कांद्याची चोरी होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर मार्केट समितीत सोमवारी 20 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन करून लिलाव बंद पाडले.

मागील वर्षभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरुच आहे. अशातच शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे. बाजार समितीत आणलेल्या कांद्याची चोरीही होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाल रोखला. बाजार समिती कार्यालयात ठिय्याही मांडला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज सकाळी दहा वाजता कांदा लिलाव सुरु होतो. मात्र लिलावापूर्वीच एका शेतकऱ्यांने आणलेल्या कांद्याची चोरी झाली. यावेळी काही शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी कांदा लिलाव रोखण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीमधील कांद्याची चोरी तातडीने रोखण्यात यावी व कांद्याच्या लिलावाची सुरुवातच किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

ऐनवेळी शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखल्याने बाजार समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. कांदा चोरी रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन समितीने दिले. यावेळी बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दुपारी कांदा लिलाव पुन्हा सुरु झाला. यावेळी आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, दिनेश शिंदे, महादेव शिंदे, मोहसीन पटेल, धर्माराज पंके, गणेश नागोडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT