सोलापूर

श्री सिद्धरामेश्वर भक्तांनी घातले एक कोटी दंडवत; मराठी भाषेतील शिलालेखावर उल्लेख

अमृता चौगुले

सोलापूर : अंबादास पोळ :  भगवंता प्रति भक्तांची श्रद्धा अनेकांनी पाहिली अथवा ऐकली असेल. परंतु, भगवंताच्या भक्तीसाठी साक्षात भगवंताच्या मंदिराभोवती एक कोटी दंडवत घालणाऱ्या भक्ताची श्रद्धा पहावयास मिळाली.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रति अखंड श्रद्धा असणाऱ्या म्हैैैसुुले येथील रायबारी दामोदर पंडित यांनी आषाढ सोमवार रोजी 'रामनाथा'स म्हणेज( श्री सिद्धरामेश्वर महाराजांना) एक कोटी प्रणाम करतो या अशा आशयाचे मराठी भाषेतील ( देवनागरी लिपी) मधील शिलालेख सोलापुरातील भुईकोट किल्ल्यामध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला किल्ल्यातील हा शिलालेख आहे.

स्वतः सिद्धरामेश्वर महाराजांनी या मंदिरामध्ये स्वहस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. या मंदिराचे नाव श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर असे ठेवले. मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांकडून देणग्यांचा वर्षाव झाला. अनेक प्रतिष्ठित अधिकारी, श्रीमंत सावकार, व्यापारी मंडळीनी गावेे, शेततळे इनामी दिले. त्यात अनेक शिलालेखात श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख 'रामनाथ' या शब्दात करण्यात आला होता.त्या सर्व घटनांची नोंद अनेक ठिकाणी सापडलेल्या शिलालेखातून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक शिलालेख तज्ज्ञ स्व.आनंद कुंभार यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. हे शिलालेख सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीचे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

या शिलालेखेत उल्लेख केल्यानुसार 'रामनाथ' म्हणजे सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर महाराज होय. कारण श्री सिद्धरामेश्वर महाराज हे एक महाशिवयोगी कुलचक्रवती होते. त्यांनी श्रीशैल यात्रा करून सोलापुरात आल्यानंतर आपल्या परमदेवतेचे म्हणजेच श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाच्या मंदिराची निर्मिती सोलापुरातील भुईकोट किल्ल्यामध्ये केली.

सोलापूरकरांचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज आहेत. सोलापूरचे मुळ नाव सोन्नलगी हे आहे. सिद्धरामेश्वर हे १२ व्या शतकातील महान संत व समाजसुधारक होते. त्यांनी सोलापूरात ६८ लिंगांची व अष्टविनायक गणपतीची स्थापना केली.श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन हे त्यांचे आराध्य दैवत होते. कर्माला महत्त्व् देणाऱ्या सिद्धरामेश्वरांनी आपल्या समग्र आयुष्यात लोकोपयोगी कार्य केले.

हा शिलालेख भुईकोट किल्ल्यात या ठिकाणी..

हा शिलालेख भुईकोट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या एकदम समोरील बाजूस जरा उंचवट्यावरून जी पायवाट जाते शनिश्वर मंदिराच्या मागील बाजूस दोन तटबंदीच्या मधील बाजूने सरळ वर चालत पुढे गेल्यावर तटाच्या आतील भिंतीस फांजीवर चढण्यासाठी चार पायऱ्या आहेत तेथेच भिंतीमध्ये हा शिलालेख बसविला आहे.

श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला शिलालेख…

सोलापूर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये 15 शिलालेख आहेत. यामध्ये मोडी, पर्शियन उर्दू , देवनागरी भाषेतील शिलालेख आहेत. त्यातील एक मराठी भाषेतील(देवनागरी लिपीतील) या शिलालेखामध्ये स्पष्ट शब्दात श्री. सिद्धेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला किल्ल्यातील एकमेव शिलालेख आहे.

श्री सिद्धारामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे.भुईकोट किल्ला हा सोलापूर जिल्ह्याचे वैभव आहे. या किल्ल्यामध्ये उपलब्ध असलेल्या शिलालेखात एका भक्ताने श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या श्रद्धेपोटी एक कोटी दंडवत घातल्याचे वर्णन करण्यात आले आहे. या शिलालेखातून भक्ताची भगवंता प्रति असलेली श्रद्धा दिसून येते. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाच्या या शिलालेखाचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.

-नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT