सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्याची जागा लाटून त्याची खरेदी करारनामा व कब्जा पावती करून त्या जागेची विक्री केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. करली यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात सुप्रिया राजेंद्र नेर्ली (वय ५४ वर्षे रा.BC 54 दर्गा रोड कँप बेळगाव कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुप्रिया यांचे वडील स्व. शिवशंकर धर्मराव थोबङे यांची वडीलोपार्जित मालकीची हक्काची शेतजमीन मजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथे होती.
फिर्यादी सुप्रिया यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आईने सुप्रिया आणि त्यांच्या दोन बहिण यांच्या नावावर ही जागा केली होती. मात्र आरोपी श्रीनिवास करली यांनी या जागेवर मालकी हक्काचे खोटे पुरावे देऊन जमीन विकण्याचा प्रयत्न केला. ५० ते ६० लोकांना नोटरीने खरेदी, करारनामा व कब्जा पावती देवून खोटे करारपत्र तयार करून ही जागेवर कब्जा मिळवला. यामध्ये फिर्यादी सुप्रिया या खऱ्या मालक असूनही त्यांच्या परस्पर ही जागा विकल्याची माहिती तक्रारीमध्ये दिली आहे. याप्रकरणी आरोपी श्रीनिवास करली यांच्यावर तक्रारीनुसार एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम.आय.डी.सी पोलिसांनी आरोपी श्रीनिवास करली यांना अटक केली असून सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी ३ दिवसांची पोलिस कोठङी देण्यात आली आहे.