Laxman Hake Pudhari File Photo
सोलापूर

Laxman Hake Maratha Youths Clash: मोहोळमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके अन् मराठा तरूणांची झटापट; ३ जण पोलिसांच्या ताब्यात

obc leader laxman hake and maratha youths clash in solapur hotel aas86

Anirudha Sankpal

Laxman Hake Maratha Youths Clash:

मोहोळ शहर पुढारी वृतसेवा :

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मोहोळ तालुक्यातील निसर्ग हॉटेल येथे जेवणासाठी थांबले असताना काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जेवण आटोपून हाके बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनासमोर काही जण उभे राहिल्याने वाद वाढला. यावेळी हाके समर्थक, संबंधित तरुण आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. मोहोळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

दोन वेळा झाला वाद

लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तीन जण हॉटेलमध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच ते व्हिडिओ तयार करीत होते. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस अधिकारी व एसपीओ कर्मचाऱ्यांनी संबंधितांना समजावून सांगून बाहेर काढले.

त्यानंतर हाके व त्यांचे सहकारी जेवण करून बाहेर पडत असताना संबंधित व्यक्ती त्यांच्या वाहनाजवळ बसल्याचे हाके यांनी सांगितले. वाहन निघत असताना ते वाहनाच्या आडवे उभे राहून पुन्हा हुज्जत घालण्याचा आणि हल्ल्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा हाके यांनी केला. त्यामुळे तेथे उपस्थित पोलिस अधिकारी व हाके समर्थकांनी हस्तक्षेप केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘ते तिघे चाकूरचे असल्याचे सांगत होते’

या घटनेनंतर मोहोळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे हाके यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचेही ते म्हणाले. तसेच ते लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असल्याचे सांगत होते, अशी माहिती हाके यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, संबंधित व्यक्तींचा हाके यांच्याशी नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्याचा प्रयत्न झाला का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिस तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

हाके यांची प्रतिक्रिया

लक्ष्मण हाके यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही जेवण करण्यापूर्वी ते लोक आले आणि आमच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे आमच्याबाबत जाब विचारण्यासारखे काहीतरी असल्याचे ते बोलत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजावून बाहेर काढले. मात्र, जेवण करून बाहेर पडताना ते पुन्हा आमच्या गाडीसमोर उभे राहिले आणि हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला.”

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तिघांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT