Ashadhi Yatra 2025 | आषाढी यात्रेत ‘नो मॅन्स आयलँड’मुळे व्यापार्‍यांना फटका Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Yatra 2025 | आषाढी यात्रेत ‘नो मॅन्स आयलँड’मुळे व्यापार्‍यांना फटका

व्यापार्‍यांना नुकसान भरपाई देण्याची पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढी यात्रा ही कुठलाही नैसर्गिक प्रकोप न होता पार पडली. मात्र, जिल्हा प्रशासनाने एकेरी मार्ग, त्याला अनुसरून नको त्या ठिकाणी बॅरेकेडींग करून गल्लीबोळ अडवून ठेवले. पश्चिमद्वार, महाद्वार येथे ‘नो मॅन्स आयलँड’ करून ठेवले. त्याचा भाविक भक्तांना व व्यापार्‍यांना अतोनात त्रास झाला आहे. अनेक व्यापार्‍यांची आर्थिक कोंडी प्रशासनाने केली आहे. त्यांना दोन-दोन लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्रकाद्वारे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी केली आहे.

इचगावकर म्हणाले की, चौफाळा चौक, महाद्वार चौक या अती गंभीर ठिकाणी निष्कारण गर्दी वाढवली गेली आहे. रस्सी पॉईंट जास्त वेळ अडवले गेल्यामुळे एका ठिकाणी 10-10 मिनिटे लोकांना थांबून गर्दीचा व गुदमरण्याचा त्रास सहन करावा लागला आहे. तसेच दिंड्या या परंपरागत सांप्रदायिक प्रदक्षिणा मार्गानेच सोडल्या जाव्यात, अशा वारंवार केल्या जाणार्‍या मागण्यांकडे दुर्लक्ष करून अनेक चमकोगिरी करणार्‍या, हालगी, ढोल, ताशे अशा बेसूर वाद्यांच्या तालावर कसेही नाचणार्‍या या दिंड्या मंदिर प्रदक्षिणा मार्गावर सोडल्या. त्यामुळे जास्त कुचंबणा झाली. यात्रा काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लावून जनतेची मुस्कटदाबी केली आहे.

वारीला आलेल्या भाविकांच्या संख्येबाबत शासनाचा 27 लाखांचा आकडा धादांत चुकीचा आहे. केवळ कॉरिडॉर मुद्दा पुढे रेटता यावा म्हणून अशी मांडणी केली जात आहे. परंतु, असे दिसते की, त्यांच्या म्हणण्यानुसार जरी हा आकडा खरा धरला तरी वारी व्यवस्थित पार पडून 2 दिवसात रस्ते मोकळे झाले. त्यामुळे कॉरिडॉरची काही एक गरज नसल्याचे स्पष्ट होत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या स्टंटबाजीचा भाविक व व्यापार्‍यांना त्रास झाला आहे. एका कॅबिनेट मंत्र्याने कॉन्स्टेबलचे काम करणे चुकीचेच होते. त्यापेक्षा मंत्री महोदय दर्शन बारीच्या रांगेत वेश बदलून सात-आठ तास सामिल होऊन आले असते, तर त्यांना कळले असते की, भाविकांना काय यातना सोसाव्या लागतात. मात्र, तसे केले नाही. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी वर्षानुवर्षाच्या अभ्यासातून चांगली कामगिरी बजावली आहे. याबाबत कोणाचे दुमत नाही. पत्रक पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष माऊली महाराज गुरव, सचिव अ‍ॅड. विनायक उंडाळे यांनी काढले आहे.

दूर बसस्थानकाचा भाविकांना त्रास

पंढरपूर शहरात भरपूर मोकळ्या जागा असताना तात्पुरती बसस्थानके दूरवर नेण्यात आली. याचा मोठा फटका व त्रास भाविकांना झाला आहे. मुख्य नवीन बसस्थानक जास्त दिवस बंद ठेवण्यात आले. खरे तर मुख्य बसस्थानकातून भाई राऊळ पुतळ्याकडे यायचा मार्ग खुला ठेवायला पाहिजे होता. दोन वर्षांपूर्वी तसे केले होते. मराठवाड्यात सोलापूरमार्गे जाणारी सर्व वाहतूक त्यामार्गे काढून मंगळवेढामार्गे सोलापूरकडे पाठवली असती तर वाहतूक अत्यंत सुरळीत झाली असती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT