सोलापूर

Pandharpur news: पंढरपुरात पालखी महामार्गाचे काम रखडलेलेच

मंत्री नितीन गडकरी करणार पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर ते पुणे पालखी महामार्गाचे काम रखडले आहे. वाखरी ते पंढरपूर दरम्यान काम संथगतीने सुरू आहे. कामाची मुदत संपूनही हे काम रखडलेलेच दिसत आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून अपघातही वाढत आहेत. या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. आषाढी यात्रेपुर्वी हे काम पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द्यावेत, अशी अपेक्षा भाविक, वारकरी यांची आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज गुरुवार, दि. 14 मे रोजी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे ते पंढरपूर या संपूर्ण पालखी महामार्गांची ते पाहणी दौरा करणार आहेत. यादरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या दौऱ्यामुळे पालखी मार्गावरील प्रलंबित अडचणी दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. पालखी महामार्गाची पाहणी करताना गडकरी यांनी वाखरी ओढ्यावरील उड्डाणपूल तसेच इसबावी येथील उड्डाणपुलाचे काम पुर्ण करण्याच्या सुचना देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

दरम्यान, मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जातात. पालखी मार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. वाखरीतील बॅरिकेड्सचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आला आहे. दौऱ्यात केवळ भूमिपूजन न होता, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष जमिनीवर काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच पालखी महामार्ग बायपासचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गावर अनेक भाविकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. गडकरी या निकृष्ट कामाची दखल घेऊन संबंधित यंत्रणेला काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT