माळशिरस : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी नुकताच संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा प्रवास बसने केला. यावेळी माळशिरस तालुक्यात घुलेवस्ती येथील रस्त्यालगत जुन्या ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळातील विहिरीजवळ थांबून विहिरीची पाहणी करीत विहिरीलगत वृक्षारोपण केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सभापती दत्तात्रय मगर, ॲड. अभिषेक पाटील, बाळासाहेब सरगर, डॉ. मारुती पाटील, जीवन जानकर, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात निर्माण केलेल्या पाणी स्रोतांपैकी ऐतिहासिक जुनी बारव (विहीर) पालखी महामार्गालगत आहे. ही विहीर नव्या पालखी महामार्गाच्या कामातून वाचली आहे. यासाठी सरकारने विशेष ब्रीज तयार करून ही विहीर वाचवली आहे. यावेळी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या विहिरीविषयी माहिती मंत्री महोदयांना दिली. अहिल्यादेवींनी अशा प्रकारच्या अनेक विहिरी, घाट आणि मंदिरांचे बांधकाम करून पाणी व्यवस्थापनात मोठी कामगिरी केली होती.
मंत्री बसमध्ये परंतु मागे गाड्यांचा ताफा
नुकतीच पंतप्रधानांनी खर्च कमी करणे यादृष्टीने केलेल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून प्रवास केला. मात्र, या बसच्या मागे कार्यकर्त्यांच्या मोठ्या गाड्यांचा ताफा चालताना दिसत होता. विहिरीजवळ मंत्री महोदय थांबताच या विहिरीच्या परिसराला महागड्या गाड्यांनी वेढा घातल्याचे चित्र दिसून आले.