पंढरपूर : मे च्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या खरिपाच्या पिकांना पाऊस लांबल्याने पाण्याची गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत. अशातच उजनी उजनी व नीरा उजवा कालव्याला आवर्तन सुरू झाले आहे. शेतकर्यांना मागणीनुसार वेळेत पाणी दिले तर पिकांना जीवनदान मिळण्याची आशा शेतकर्यांना लागली आहे.
जुनच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांनी ऊस, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ तसेच हुलगा, मटकी, चवळी, उदीड आदी पिकांची पेरणी केलेली आहे. ही पिके सध्या गुडघ्ंयाला आलेली आहेत. अधून मधून पडणार्या हलक्या पावसाच्या सरीमुळे ही पिके तग धरुन आहेत. तर माळरानावरील पिके पावसाअभावी माना टाकू लागली आहेत. ही पिके वाचावीत, याकरीता शेतकरी पावसाकडे आतूरतेने पाहत आहे. मात्र, पाऊस काही केल्या दमदारपणे येत नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
खरीप पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. स्वत:कडे उपलब्ध असलेल्या बोअरवेलचे पाणी पिकांना देत आहे. तर ज्या शेतकर्यांकडे पाणी कमी आहे, असे शेतकरी ठिबकसिंचन करुन पिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच उजनी व वीर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणात मुबलक पाणी साठा तयार झाला आहे. त्यामुळे उजनी व वीर धरणातून रब्बी हंगामातील शेती पिकासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून उजनी डउजवा कालव्याला तर मागील दोन दिवसापासून नीरा उजवा कालव्याला आवर्तन सुरु झाले आहे. जोरदार पाऊस पडेल म्हणून शेतकर्यांनी ऊस पिकाची बांधणी केली आहे. मात्र, पाऊस पडला नसल्याने या पिकांला जादा पाण्याची गरज आहे. तर बोर, डाळींब, पेरु, शेवगा, द्राक्षे या फळबागांना देखील पाण्याची नितातं गरज आहे. नीरा व उजनी कालव्याचे पाणी या पिकाना मिळणार असले तरी पिके जोमात येण्यासाठी जोरदार पावसाची गरज भासत आहे.
नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे टेल टू हेड असे योग्य नियोजन करुन शेतकर्यांच्या पिकांना मागणीनुसार पाणी देणे गरजेचे आहे. असे झाले तरच पिकांना जीवनदान मिळणार आहे. अन्यथा पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका पिकांना बसत असल्याचा आजवरचा इतिहास असल्याचे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.