गुळवंची : काही व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील एका २५ वर्षीय नवविवाहित तरुणाने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हे कृत करण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून, ज्यात त्याने त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली, तो आपल्या नातेवाईकाला पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अमर लहू मुळे (वय २५) असे त्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी त्याने वांगी-कळमण रस्त्यालगतच्या गायरान जमिनीतील एका कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आत्याच्या मुलाच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आणि घटनास्थळाचे लोकेशन पाठवले. 'काही व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी जीवन संपवत आहे, खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहा. माझ्या मोबाईलमध्ये पुरावे आहेत,' असे त्याने व्हिडिओत म्हटले आहे.
व्हिडिओ मिळाल्यानंतर अमरच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शनिवारी रात्रभर वांगी शिवारात त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता, त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
अंगावरची हळदही निघाली नव्हती...
अमर हा वाहनचालक म्हणून काम करत होता. त्याचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ६ जून रोजी पंढरपूर तालुक्यातील ऋतुजा सुरवसे यांच्याशी झाला होता. अंगावरची हळद निघण्यापूर्वीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक म्हणजे, अमरचे वडील मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेले असतानाच, त्यांना मुलाच्या आत्महत्येची बातमी समजली. एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अमरच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.