Accident News 
सोलापूर

Accident News | नियतीचा क्रूर खेळ! सोलापूर-धुळे हायवेवर भीषण अपघातात भरधाव नेक्सॉन कारचा चेंदामेंदा; साखरपुडा झालेल्या दांपत्याचा मृत्यू

Accident News | टोलवेच्या कमानीला कार धडकून अक्षय आणि अक्षयाचा दुर्दैवी अंत

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर | पुढारी वृत्तसेवा | बाळासाहेब जाधव

वाशी तालुक्यातील आठ दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नियोजित नववर–वधूचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (मूळ रहिवासी), सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता. १५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.

मयत नववधू अक्षया हिची आज लातूर येथे परीक्षा होती. परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरच्या टाटा नेक्सॉन (क्रमांक MH 25 BF 5064) या कारमधून जात असताना हा अपघात झाला.

रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

या भीषण अपघातात नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय २३) आणि वर अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अक्षय यादव सिरसट (वय २२) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण–तरुणीच्या अकाली मृत्यूमुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT