करमाळा : करमाळा कुर्डूवाडी बस आगारास नवीन बस मिळाव्यात तसेच मतदारसंघातील समस्या बाबत बैठक घेण्याची मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
करमाळा मतदारसंघातील करमाळा व कुर्डुवाडी आगारातील नादुरुस्त बस व असुविधेमूळे वेळापत्रक कोडमडलेले आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.त्यामुळे दोन्ही आगारास प्रत्येकी 30 नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 2023 मध्ये करमाळा आगारात 76 बसेस होत्या मात्र सद्यस्थितीत 56 बसेस असून त्यापैकी 50 बसेसमधून प्रवाश्यांची वाहतूक होत आहे. कुर्डूवाडी आगाराचीही स्थिती बिकट असून तेथेही बसेस आवश्यक आहेत.
करमाळा आगाराच्या बस प्रवास सुरु असतानाच बिघाडामुळे बंद पडत आहेत.तसेच काही बसचे अपघात होऊन प्रवासी जखमी झाले आहेत.करमाळा तालुक्यास 8 वर्षापूर्वी केवळ चार नविन बसेस देण्यात आल्या आहेत. करमाळा व कुर्डूवाडी आगारात एस टी गाड्यांची संख्या कमी असून 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या बसेसची संख्या ही जास्त असून त्या मोडकळीत आल्या आहेत. खराब बसेस मुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे आ.पाटील यांनी ना. सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिले.
करमाळा व कुर्डूवाडी आगारामधील यांत्रिकी व प्रशासकीय रिक्त पदे,चालक-वाहक रिक्त पदे तसेच कुर्डूवाडी आगाराचे पुनर्बांधणी तसेच करमाळा व कुर्डूवाडी आगारतील विविध समस्या बाबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी ही परिवहन मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.