येथील न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी (दि. 18) जीवन संपवण्यापूर्वी वकिलाच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी आपल्या मृत्युपत्रात बदल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे आत्महत्येसाठी डॉ. वळसंगकर अगोदरपासूनच तयारी करीत होते का, त्यांना मृत्युपत्रात बदल का करावा वाटला, नेमका काय बदल त्यांनी मृत्युपत्रात केला, हे व यासह असंख्य प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. दरम्यान, यामुळे डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणास आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सोलापुरात खळबळ उडाली. तीन दिवसांनंतरही सोलापुरात त्यांच्या आत्महत्येविषयी नानाविध चर्चा सुरू आहेत. तशातच डॉ. वळसंगकरांचे हॉस्पिटल आणि त्यांच्या परिचयातील लोकांमध्ये दबक्या आवाजत वेगवेगळे विषय चर्चिले जात आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉ. वळसंगकर हे हॉस्पिटलमध्ये आले. पेशंटची तपासणी केली. स्टाफशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते घरी निघाले. हॉस्पिटलमधून ते थेट घरी गेले नाहीत. ते वकिलांकडे गेले. तेथे डॉ. वळसंगकरांनी त्यांच्या मृत्युपत्रात बदल केला. त्यानंतर ते घरी पोहचले आणि पुढे साडेआठच्या सुमारास त्यांनी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अतिशय शांतपणे, विचारपूर्वक डॉ. वळसंगकरांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असा तर्क आता निघत आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने ही पोलीस कोठडीत आहे. तिच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी खूपच गुप्तता पाळल्याने चौकशीत मुसळे-माने काय सांगत आहेत हे प्रसारमाध्ययमांना समजण्यास अडचणी येत आहेत.
डॉ. वळसंगकरांना त्यांनी उभारलेल्या संस्थेतून बेदखल करण्यात आले होते. कोणतेही निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नव्हता. एवढी मोठी संस्था आपण उभी केली आणि तिथेच असा अपमान होत आहे. आपल्या हातात काहीच अर्थकारण उरले नाही. यामुळे ते प्रचंड नैराश्येत होते. तसेच
डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येमागे फक्त मनीषा मुसळे-माने या एकट्या असूच शकत नाहीत. डॉ. वळसंगकरांचा कौटुंबिक कलहाचाही यामध्ये समावेश असू शकतो, अशी चर्चा सोलापुरात आहे.
डॉ. वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यातही वारंवार खटके उडत होते. हॉस्पिटलमधील आर्थिक मॅनेजमेंट हे त्यांच्या वादाचे एक कारण होते. त्यामुळे त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी पावलेही टाकल्याची चर्चा आहे.