पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खा. प्रफुल्ल पटेल, आ. छगन भुजबळ, मी सुनील तटकरे आम्ही एकत्रितपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो एनडीएमधील सहभाग आहे. त्यामुळे आम्ही आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भवितव्यासाठी राजकीयदृष्ट्या काम करणार आहोत, असे सांगत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर एकत्रित येण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अप्रत्यक्षपणे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.
खा. सुनील तटकरे सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गुरुवार, दि. 17 रोजी आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, मी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीकडे तसेच तुळजापूरची तुळजाभवानी, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्याकडे काहीही मागणे घातले नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत, अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केली नाही. तर राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस यावेत. सर्वसामान्य नागरिक सुखी व्हावेत, अशी विठ्ठलचरणी मागणी केली असल्याचे सांगितले. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील उपस्थित होते.