सोलापूर : आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि उत्साहाची पर्वणी घेऊन शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (दि.११) सुरुवात होत आहे. शहरातील मानाच्या श्री रुपाभवानी मंदिरासह विविध देवी मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रुपाभवानी मंदिरात सकाळी ११.३० वाजता घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ होणार आहे. शहरातील ४०८ सार्वजनिक देवी मंडळांकडून शक्तिदेवीची स्थापना करण्यात येणार असून, त्यापैकी २१६ मंडळे मिरवणुकीने देवीची स्थापना करणार आहेत.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील देवी मंदिरांमध्ये स्वच्छता, सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री रुपाभवानी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, नऊ दिवस मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ राहणार आहे. शहरातील अन्य देवीमंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये देवीचा जागर केला जाणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. त्यासाठी आवश्यक असलेले पूजेचे साहित्य, फुले, हार, नारळ, फळे, कलश आणि इतर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्थापनेसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत मुहूर्त आहे. त्यामुळे सकाळपासूनच घटस्थापनेची तयारी करून शुभमुहूर्तावर देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविकांची लगबग राहणार आहे.
पहिल्या दिवशी १,१०० पोलिसांचा बंदोबस्त
नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. घटस्थापनेच्या दिवशी शहरात १,१०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंदिर परिसर, सार्वजनिक मंडळे, मिरवणुकीचे मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला जाणार आहे.
रुपाभवानी मंदिरात विविध कार्यक्रम
नवरात्रौत्सवात दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना होणार आहे. १५ ऑक्टोबरला ललिता पंचमीनिमित्त सायंकाळी कुंकुमार्चन होईल.
१८ ऑक्टोबरला दुर्गाष्टमीनिमित्त अलंकार महापूजा व होमास प्रारंभ होऊन रात्री पूर्णाहुती होईल. याच दिवशी दहीहंडीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
१९ ऑक्टोबरला महानवमीनिमित्त अलंकार पूजा होईल. तर २० ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त सायंकाळी ४ वाजता मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर सीमोल्लंघन व शमीपूजन होणार आहे.
आज मिरवणुका
शहरात यंदा ४०८ सार्वजनिक देवी मंडळांकडून शक्तिदेवीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यापैकी २१६ मंडळे मिरवणुकीने देवीची स्थापना करणार आहेत. मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, मंडपांची सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.