सोलापूर : पूर्व भागात भारतीय चौकात जागृत देवी म्हणून ख्याती असलेले श्री भवानी देवी मंदिर आहे. मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील अखंड पाषाणात बनवेलेली देवीची मुुर्ती आहे.
नवरात्रोत्सवात दररोज तीनशे ते चाराशे पूजा याठिकाणी होतात. सोलापूरसह इतर राज्यांतील भक्तजन याठिकाणी आवर्जून येतात. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी माता म्हणून भवानी देवीची ख्याती आहे. या मंडळाची स्थापना 1974 साली झाली असून मंडळाचे यंदाचे 51 वे वर्ष आहे. 1986 साली (कै.) विठ्ठलराव चिटमपल्ली, (कै.) पुरणचंद्र पुंजाल, (कै.) शंकर महाले, (कै.) देवीदाअप्पा चिटमपल्ली, (कै.) नामदेव पवार, (कै.) सखाराम सुरवसे आदींनी भारतीय चौकात शनिवार पेठ येथील हिबारे बंधू यांची अकराशे स्क्वेअर फूट जागा खरेदी केली.
त्याठिकाणी 1989 साली सांगलीच्या योगिनी मालती बाळ यांच्या हस्ते मंदिराच्या बांधकामास प्रारंभ करत भव्यदिव्य असे मंदिर उभारण्यात आले. देवी मूर्तीची प्रतिष्ठापना 1991 साली करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते करण्यात आली.
मंडळाचे कार्याध्यक्ष विठ्ठल चित्तमपल्ली यांनी सर्वधर्मीय पन्नास लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे विनामूल्य आयोजन केले आहे. सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह करण्याचा संकल्पदेखील केला आहे. ज्या भाविकांनी गेल्या 50 वर्षांपासून पूजा केली, देणग्या दिल्या आहेत या सर्व भक्तांना 10 ग्रॅम देवीची प्रतिमा असलेला चांदीचा शिक्का भेट देण्याचा निर्धार मंडळाने केला आहे.
अशी मूर्ती अन् मंदिर
मंदिराच्या गर्भघरात काळ्या पाषाणातील अष्टभुजा भवानी देवीची मूर्ती विराजमान आहे. देवी अष्टभुजा असून हातामध्ये विविध शस्त्रे आहेत. तामिळनाडू येथून साडेपाच फुटाची काळ्या पाषाणातून घडवलेली ही मूर्ती व्यंकटेश सपार यांच्याकडून रेखीव करून घेण्यात आली. 1996 साली देवीच्या मंदिरावर सुवर्ण कळसारोहण देगावचे मंहत सिध्दयोगी श्री शिपलागिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले असे मंदिराचे सचिव सुरेश फलमारी यांनी सांगितले.