सोलापूर : नवरात्र महोत्सवाला प्रेरणा देणारी आझाद हिंद मंडळाची शक्तीदेवी सोलापुरात प्रसिद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर सार्वजनिक स्वरूपात श्री शक्तिदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 1936-37 दरम्यान झाली. नऊ दिवस पूजाअर्चा करून विजयादशमी दिवशी शहरातून मिरवणूक काढली जात असे. भविष्यात या मंडळाचे अनुकरण करत प्रेरणा घेऊन तुळजापूर वेस येथील बलिदान चौक, भवानी पेठ, नवी पेठ, कुंभार वेस, बाळी वेस, लष्कर, मोदी, रेल्वेस्टेशन अशा अनेकठिकाणी नवरात्र उत्सव साजरे होऊ लागले. 88 वर्षे झाली ही परंपरा आजतागायत कायम आहे.
मेळे भरवणार्या संस्था आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून त्याकाळी प्रसिद्ध अभिनेते मास्टर भगवान यांचे बंधू मारुती पालव सोलापुरात येत असत. गर्दीचे ठिकाण म्हणून आझाद हिंद चौकात (मेकॅनिक चौकात) त्यांचे वास्तव्य असे. त्यांनी आझाद हिंद चौकातील कार्यकर्त्यांना मुंबईतील नवरात्र उत्सवाची माहिती दिली. त्यामुळे प्रभावित होऊन स्थानिक कार्यकर्ते आणि शहराचे शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशी यांच्या नेतृत्वाखाली राजूशेठ उपाध्ये, विश्वनाथ पाटील, पन्नालाल गुप्ता, मंजन पुकाळे, मनोहर कोडगुळे, संगप्पा वाले, भाऊ माडीकर, मन्मथ मेनकुदळे यांनी सोलापूर शहरात नवरात्र उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार या मंडळाची स्थापना झाली. त्याकाळी आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळाची शक्तिदेवीची लाकडी रथामध्ये स्थापना केली होती. मिरवणुकीत सर्व भक्तांकडून दोरखंडाने रथ ओढला जातो.
मंडळांची संख्या वाढू लागली. मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकार्यांमध्ये येणार्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सार्वजनिक मंडळांतील दुवा म्हणून हुतात्मापुत्र शंकरप्पा धनशेट्टी यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाची स्थापना केली. अध्यक्ष शंकरप्पा धनशेट्टी, उपाध्यक्ष धोंडिबा धोत्रे, सचिव मन्मथ मेनकुदळे, मंठाळकर यांनी मरेपर्यंत या पदावर आपली सेवा दिली. यानंतर 1987 साली (कै.) मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती मंडळ रजिस्टर झाले. जगदीश मुनाळे ट्रस्टी अध्यक्ष झाले, तर कै मगनलाल धोत्रे, कै. विजय परदेशी, दास शेळके, कै. अर्जुन सुरवसे, कै. नंदू मुस्तारे, रमेश दुलंगे, कै श्याम ढोले, मल्लिनाथ मसरे, (कै.) धर्मा भोसले, कै. अभिमन्यू भोसले, दिलीप कोल्हे, मल्लिनाथ गिराम, एकनाथ अलकुंटे यांच्यासह अनेकांचा समावेश यामध्ये होता.
1992 साली मध्यवर्ती मंडळाची जवाबदारी (कै.) शिवाजी पिसे यांच्यावर आली. त्यांनी सलग 25 वर्षे मध्यवर्ती मंडळासाठी पूर्ण शक्तीने सेवा दिली. पिसे यांच्यानंतर सध्या दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, दास शेळके, मल्लिनाथ मसरे, दत्तात्रय मेनकुदळे शिवानंद सावळगी, अॅड. प्रशांत कांबळे देवीचरणी आपली सेवा देत आहेत.
लाकडी फळ्यांचा असायचा खुला मंच
सोलापुरात साधारण 1930 च्या कालावधीत गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये मेळे भरले जायचे. लाकडी फळ्यांचा खुला मंच आणि चहूबाजूने जनसमुदाय, असे मेळ्याचे स्वरूप असायचे. यात समाजप्रबोधन, कौटुंबिक, मार्मिक, गवळणी, भारूड, विडंबन, विनोद आणि देशभक्तिपर संदेश दिले जायचे. सोलापूर शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे मेळे होत असत.