सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवी हे एक धार्मिक महत्त्व असलेले मंदिर आहे. सोलापूर शहराच्या मध्यभागापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचे प्रतीकात्मक रूप असल्याने या देवीला श्री रूपाभवानी देवी असे संबोधले जाते. (Navratri 2023)
ही देवी सोलापूर शहराचे रक्षण करते, अशी येथील स्थानिकांची धारणा आहे. सुमारे 125 ते 150 वर्षांपूर्वी सध्याचे जमीन मालक दीपक जंबुकुमार शहा यांच्याकडे सध्या पुजारी असलेले अंबादास दत्तात्रय पवार यांच्या मातोश्री गंगाबाई पवार यांचे वडील बंडोबा पुजारी हे शहा यांच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करीत होते. ते श्री तुळजाभवनी देवीचे निस्सीम भक्त होते. एके दिवशी सध्या जिथे देवीची मूर्ती आहे, त्या ठिकाणी पडीक जमिनीचे शेत होते. त्या ठिकाणी झाडी तोडणे व नांगरटीचे काम चालले होते. बंडोबा पुजारी शेत नांगरत असताना नांगरटीमध्ये एक मूर्ती सापडली. या मूर्तीचे रूप तुळजाभवानी देवीचेच प्रतिरूप असल्याचाच बंडोबा पुजारी यांना दृष्टांत झाला. म्हणून मूर्तीचे नाव रूपाभवानी असे ठेवण्यात आले. तेव्हापासून श्री रुपाभवानी देवीस नित्यनियमाने अभिषेक नैवेद्य, पूजा-अर्चा व्यवस्थितरित्या पार पडतात. (Navratri 2023)
मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी देवीसाठी महापूजा केली जाते. मंदिरात पुराणातील कथांचे कोरीवकाम असलेली प्राचीन वास्तुकला आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवात धार्मिक कार्यक्रम पार पडतात, त्याप्रमाणे रूपाभवानी देवीच्या मंदिरातदेखील पार पडतात. नवरात्र उत्सवामध्ये शहराच्या कानाकोपर्यातून भाविक पायी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्र उत्सवातील ललिता पंचमीला कुंकमार्चनास प्रारंभ होतो. दुर्गाष्टमीला देवीची अलंकार महापूजा होऊन होमहवन होते. त्यानंतर पुजारी मल्लिनाथ मसरे यांच्या घरातून दहिहंडी मिरवणूक निघते व रात्री देवीचा छबिना होता. विजयादशमीदिवशी देवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन पार्क मैदान येथील शमीच्या वृक्षाजवळ देवीचा सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरला जाणारे लाखो भाविक रूपाभवानी मंदिरात विसावा घेऊनच पुढे मार्गस्थ होतात. कोजागरी पौर्णिमेला देवीची अलंकार महापूजा करून रात्री छबिना काढून देवीच्या नवरात्र उत्सवाची समाप्ती होते. (Navratri 2023)