Nira Canal car falls
नातेपुते : नातेपुते (ता. माळशिरस) येथील परिसरातील जुन्या पालखी महामार्गावर निरा उजवा कालव्याच्या पुलाजवळ भीषण अपघात घडला. मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी कार पुलावरून थेट वाहत्या पाण्यात कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर चालक बचावला आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये प्रीती सुनील टिळेकर, त्यांचे वडील हनुमंत जठार आणि आई मंजू हनुमंत जठार (सर्व रा. दूधबावी, ता. फलटण) यांचा समावेश आहे. कारचे चालक सुनील मोहन टिळेकर हे अपघातातून बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान दोघांचे मृतदेह सापडले असून प्रीती टिळेकर यांचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. कालव्यात शोधमोहीम सुरू असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.