नातेपुते : नातेपुते (ता. माळशिरस) येथील जुन्या पालखी मार्गावरील नीरा उजवा कालव्यात कार कोसळल्याने बुडून आई, वडिलांचा मृत्यू झाला. तर, विवाहीत मुलगी बेपत्ता आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 3) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेतील दोन मृतदेह सापडले असून, हनुमंत जठार, मंजुळा जठार अशी त्यांची नावे आहे. तर, प्रीती टिळेकर यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. या घटनेतील कारचा चालक जावई सुनील मोहन टिळेकर हा सुखरूप बचावला आहे. हे सर्वजण (रा. दूधबावी, ता. फलटण) येथील आहेत. ते मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईहून हनुमंत जठार, मंजुळा जठार, प्रीती व सुनील कारमधून (एम.एच. 43 सीसी 0158) नातेपुतेकडे येत होते. यावेळी जावई सुनील मोहन टिळेकर हे कार चालवत होते. नातेपुते (ता. माळशिरस) येथील जुन्या पालखी मार्गावरील नीरा उजवा कालव्याजवळ त्यांची कार अचानक कालव्यात कोसळली. पाण्यात बुडल्यानंतर कारचे सर्व दरवाजे लॉक झाले. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ही कार पुलापासून 300 फूट लांब वाहून गेली. पहाटे घडलेल्या अपघातातील कार सकाळी 10 वाजता बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना यश आले.
या घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस व पाटबंधारे विभाग अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोकलेनच्या साहाय्याने शोधकार्य हाती घेऊन कार कालव्यातून बाहेर काढली. त्यामध्ये सासरे हनुमंत जठार, सासू मंजूळा या दोघांचे मृतदेह सापडले. तर, प्रीती टिळेकर यांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. कालव्यात शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जावई सुनील मोहन टिळेकर हे अपघातातून सुखरूप वाचले.
अकलूज उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी ही घटनास्थळी भेट दिली. यावेळी पंढरपूर येथील शोधपथक रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेत होते. मृत झालेले सर्वजण नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेले होते.