करमाळा : प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाने पावन झालेले हिवरे येथील मंदिर.  Pudhari Photo
सोलापूर

Nagnath Temple | श्रीरामांनी अभिषेक तर शिवरायांनी दर्शन घेतलेले नागनाथ मंदिर

हेमाडपंथी बांधकामाचा अतिप्राचीन नमुना

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुक्यातील हिवरे येथील श्री नागनाथ मंदिर हे हेमाडपंथी बांधकामाचा अतिप्राचीन नमुना म्हणून ओळखले जाते. या मंदिरात खुद्द प्रभू श्रीरामाच्या हस्ते अभिषेक झाला आहे. याबाबत श्रीरामाचा शिलालेख मंदिर परिसरामध्ये आढळून येतो. परंडा किल्यावर जाताना छत्रपती शिवाजी महाराज देखील येथे दर्शनासाठी आल्याची नोंद आढळून येत आहे. या ठिकाणी शत्रुला चकवा देण्यासाठी दोन प्रचंड भुयारी मार्ग खोदलेले आहेत.

या मंदिरावरूनच या गावाला हिवरे नागोबाचे अशी ओळख पडली आहे. मंदिर परिसरात दगडी बांधकामातील कोरीव आशा दोन बारवा (विहिरी) आहेत. यापैकी एका विहरीला थेट काशी येथील नदिचा झरा आसल्याचे सांगण्यात येते. यावरुन तिला काशी विहीर म्हणून ओळखले जाते. या विहिरीतील पाण्याचे तुपात रुपांतर झाले होते. अशी आख्यायिका असून आजही या विहिरीतील पाण्यावर तेलकट तवंग तरंगतो, तर दुसर्‍या विहिरीतील पाणी काचेसारखे चमकते.

मूळची बार्शी तालुक्यातील घारी (घारापुरी) येथील व हिवरे येथे लग्न होऊन आलेल्या वाणी कुटुंबातील महिलेची घारी येथील नागनाथावर अपार श्रद्धा होती. प्रत्येक सोमवारी हिवरे येथून घारी येथे दर्शनाला ती जात असे. पावसाळ्यात सीना नदीला पूर येत आसायचा. त्यावेळी नदी ओलांडून या महिलेला जावे लागायचे. वाण्याच्या या महिलेने पाण्यात पाय ठेवला की आपोआप सीनामाईची वाहणारी धार थांबायची अशी आख्यायिका सांगितली जाते. तिच्या भक्तीला पाहून नागनाथ महाराज तिच्यासमोर साक्षात प्रकट झाले व तिला हवा तो वर मागण्यास सांगितले. त्या महिलेने हिवरे येथे येण्याची विनंती मान्य करून नागनाथ महाराज हिवरे येथे आले तिथे मंदिर उभारले. अशी कथा सांगीतली जाते. पुढे हि महिला वाणी माता म्हणून ओळखली जाऊ लागली.

मंदिराकडे कसे जाल

हेमाडपंथी बांधकामाचा आति दुर्मीळ नमुना असलेले अतिप्राचीन हिवरे येथील श्री नागनाथ मंदिराकडे जाण्यासाठी करमाळा शहरापासून 17 किमी अंतर आहे.बार्शी करमाळा रस्त्यावर बार्शीपासून 45 किमी अंतरावर तर परांडा पासून 30 व धाराशिव पासून 90 किमी अंतरावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT