सोलापूर : गोकुळ साखर कारखान्याकडून उसाचे बिल मिळत नसल्याच्या विवंचनेतून तणनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामचंद्र आप्पाशा कळके (वय ५०, रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रामचंद्र कळके यांचा सुमारे ५० टन ऊस गोकुळ साखर कारखान्याकडे गेला होता. मात्र अद्याप त्याचे बिल मिळाले नव्हते. पावसाळी हंगामातील शेतीची मशागत, पेरणीचा खर्च, आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यामुळे ते चिंतेत होते. या आर्थिक तणावातून त्यांनी गुरूवारी (दि. १८) रात्री शेतातच तणनाशक प्राशन केल्याचे त्यांचे बंधू बसवेश्वर कळके यांनी सांगितले.
तणनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना नातेवाईकांनी तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी (दि. २१) सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कळके यांनी ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता, अशी माहिती आंदोलनकर्ते ॲड. अमोल पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
उसाच्या बिलासाठी आपण लढा देत आहोत. पण शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आमचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आवाहन आहे की, त्यांनी लवकरात लवकर यावर मार्ग काढावा. या प्रकरणी गोकूळ शुगरचे दत्ता शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.- ॲड. अमोल पाटील (मुख्य आंदोलनकर्ते)