पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप च्या माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाला झुगारून मतदारांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांना 11136 मताधिक्यांनी निवडून दिले आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेवर अपवाद वगळता गेल्या चाळीस वर्षांपासून एकहाती असलेली परिचारक (भाजप) च्या सत्तेला सुरुंग लावला आहे. तर 11 नगरसेवकही निवडून आले आहेत.
भाजपचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. तर परिचारक प्रणित पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 4 उमेदवार तर 1 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आला आहे. यंदा प्रथमच भाजपने कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या पंढरपूरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या 18 प्रभागातून 36 नगरसेवक तर 1 नगराध्यक्ष पदासाठी दि.2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर दि. 21 डिसेंबर रोजी पंढरपूर येथील शासकीय धान्य गोडावून येथे मतमोजणी झाली. या मतमोजणीत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत आघाडी वाढतच गेली.
डॉ. प्रणिता भालके यांना 34960 मते मिळाली तर भाजपच्या शामल शिरसट यांना 23824 मते मिळाली. प्रणिता भालके या 11136 मतांधिक्यांनी विजयी झाल्या आहेत. यांना मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नागेश भोसले, शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, अनिल सावंत, नागेश फाटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव यांची भक्कम साथ मिळाली. तर भाजप व परिचारक विरोधकांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे दिसून आले.
भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, प्रणव परिचारक यांनी निवडणूक हातात घेतली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासून या निवडणुकीत लक्ष घातले होते. पालकंमत्री गोरे यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या निवडणूकीत लक्ष घातले होते. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्या विठ्ठल परिवारात फूट पाडण्यासाठी त्यांच्या विरोधात आ. अभिजित पाटील यांना स्वतंत्र पॅनेल उभा करायला लावले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कल्याणराव काळे, युवराज पाटील, गणेश पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली. अखेर ही निवडणूक भाजपचे परिचारक विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यातच झाली.
भाजपकडून स्टार प्रचारक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विकासाच्या मुद्यांवर प्रचार सभा गाजवल्या तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके यांनी स्थानिक भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून, लाव रे तो व्हिडीओपर्यंत सभा लक्षवेधी केल्या. भालके यांच्या प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा मतदारांना आवडल्याचे निकालावरून दिसून आले. तसेच कॉरिडॉर बांधितांचा भाजपविरोधात रोष दिसून आला. एकंदरी भाजपचे नगरसेवक जादा आले मात्र नगराध्यक्ष निवडून आला नाही. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती भाजपची झाली आहे.