सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांच्याबाबत महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, क्रीडांगणे, बसस्थानके व रेल्वे स्टेशन या परिसराचे कुंपण-कंपाउंडिंग आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
देशात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात 60 हजारांच्या आसपास भटकी कुत्रे आहेत. महापालिकेच्यावतीने निर्बिजीकरण करत संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यावर वर्षाला लाखो रूपये खर्च केले जात आहेत. तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर उपाययोजना म्हणून आयुक्तांनी सर्व शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुले, बसस्थानके व रेल्वे स्टेशन, संस्थेच्या परिसरात कुंपण घालावे, भटक्या प्राण्यांचा प्रवेश होणार नाही, यासाठी उपाय करणे. त्याठिकाणी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आवाहन ओम्बासे यांनी केले.