सोलापूर : सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी या भागातील रहिवासी व व्यापारी यांनी केलेले अतिक्रमण, अस्वच्छतेसह इतर बाबींसंदर्भात सोलापूर महापालिका पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण सुरू आहे.
सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरण व संबंधित सर्व विभागांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेच्या वतीने विमानतळ परिसर लगत राहणाऱ्या सर्व नागरिक, व्यापारी, दवाखाने, मांसाहारी पदार्थ विक्रेते तसेच गॅरेज व्यावसायिक यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर विमानतळाच्या कंपाऊंड वॉल लगतच्या भागामध्ये काही नागरिक व व्यापारी यांच्याकडून वारंवार कचरा थेट विमानतळाच्या परिसरात टाकण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या कचऱ्यातील खाद्यपदार्थांच्या वासामुळे पाळीव व भटके प्राणी, पक्षी, घारी मोठ्या प्रमाणात त्या भागाकडे आकर्षित होत असून त्यामुळे विमानतळ परिसराच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे महापालिकेच्या निरीक्षणात आले आहे. तसेच गॅरेजधारकांकडून टायर जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर व प्रदूषण यामुळे वातावरण दूषित होत असल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. विमानतळाच्या लगतच्या परिसरात काही ठिकाणी नागरिकांकडून शौचालयाच्या भिंतीवरून अथवा उंचावरून पतंग उडविण्याचे प्रकारही दिसत असून यामुळे विमान सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अनधिकृत बांधकामे, पत्रा शेड, शौचालये व अतिक्रमणाची प्रकरणेदेखील समोर आली आहेत.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी त्याठिकाणी सर्व रहिवासी व व्यापाऱ्यांनी आपला कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा. विमानतळाच्या कंपाऊंडच्या आत किंवा परिसरात कचरा फेकू नये. मटण, चिकन, मासे आदी मांसाहारी पदार्थ तसेच कचरा उघड्यावर फेकता कामा नये. गॅरेज व्यावसायिकांनी टायर, रबर वा अन्य वस्तू जाळून धूर निर्माण करू नये. विमानतळ परिसरातील कोणत्याही घरातून पतंग उडवू नये, असे आदेश दिले आहेत.