सोलापूर : एफ.टी.के. किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्तेची उत्कृष्ट तपासणी करणाऱ्या माढा तालुक्यातील मुंगशी येथील आशा स्वयंसेविका रूपाली गावले हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत दि. 8 ते 22 मार्च दरम्यान देशभर राष्ट्रीय जल महोत्सव सुरू आहे. या महोत्सवानिमित्त केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या सूचनांनुसार राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत एफ.टी.के. किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्तेची उत्कृष्ट तपासणी करणाऱ्या जिल्ह्यातील मुंगशी आर येथील आशा स्वयंसेविका गावले यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थिती दिल्ली येथे नामांकित करण्यात आले.
राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर विविध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचे नामांकन मागविण्यात आले होते. जल महोत्सव कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून 10 जिल्ह्यांची निवड केली होती. जल जीवन मिशन अंतर्गत एफ.टी.के. किटच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करण्याचे गावले यांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विविध पाणी स्त्रोतांची गुणवत्ता तपासता येऊ लागली. तसेच महिला बचत गटांमधील महिलांनाही पाण्याच्या रासायनिक व जैविक तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले.
जलजीवन मिशनअंतर्गत मला एफ.टी.के. किटच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करण्याच्या कामामुळे दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत जल महोत्सव 2026 कार्यक्रमासाठी माझे नामांकन झाले ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.- रूपाली गावले, आशा स्वयंसेविका, मुंगशी, माढा