आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ओला, उबेर या खासगी कंपन्यांप्रमाणे रिक्षा अन् टॅक्सीची सुरक्षित सेवा ग्राहकांना उपलबध करून देण्यासाठी महामंडळाने ‘छावा राईड’ हे ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढे आपण बस स्टॅडवर उतरल्यावर किंवा स्टॅंडकडे जाताना आपल्याला खासगी रिक्षांना हात करण्याची गरज उरणार नाही. एसटीच्या ग्राहकांना ही सेवा आता एसटी महामंडळच देणार आहे.
एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह व पारदर्शक सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे. प्रवासी आणि चालक या दोघांनाही याचा लाभ होणार आहे. मोठ्या शहरांत अनेकदा रिक्षाचालक भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. तो त्रासही यामुळे संपुष्टात येणार आहे.
छावा राईड ॲपच्या माध्यमातून रिक्षा व टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. रिक्षा, टॅक्सी बुकिंगची सोपी पद्धती, वाजवी भाडे आणि नोंदणीकृत, विश्वासार्ह चालकांची सेवा या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. त्याचबरोबर यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना नियमित उत्पन्नाची संधी मिळणार आहे.
आरंभी निवडक शहरात सेवा
वाढत्या डिजिटल वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एसटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ही योजना स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यात याचा विस्तार करण्याचा एसटीचा विचार आहे. यासाठी आवश्यक नियमावली, तांत्रिक यंत्रणा आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
ओला उबेरच्या धर्तीवर महामंडळाकडून छावा राईड ॲप विकसित करण्याचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावरून घेतला आहे. मात्र, याबाबत अधिकृत सविस्तर माहिती अद्यापही स्थानिक स्तरावर प्राप्त झालेली नाही. हे ॲप प्रवाशांना दिलासादायक ठरणार यात शंकाच नाही.- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक, परिवहन महामंडळ, सोलापूर