सोलापूर : यंदाच्या आषाढी वारीत सुमारे सव्वादोन लाख प्रवाशांच्या प्रवासातून परिवहन महामंडळाला गेल्या वर्षीपेक्षा २३ लाख ७४ हजार ४९० रुपयांची वाढ होऊन २ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी एसटीच्या सुमारे ४ हजार ६४३ फेऱ्या कराव्या लागल्या आहेत.
यंदाच्या आषाढी वारीच्या दरम्यान सोलापूर विभागाने चांगली कामगिरी केली. या विभागातील २ लाख २१ हजार ९४८ वारकरी भाविकांनी एसटीने प्रवास केला आहे. या काळात येथील विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नऊ आगारातील बसेस ह्या ४ लाख ५१ हजार ९५८ किलोमीटर अंतर कापण्यासाठी धावल्या. बसेसच्या या धावण्यातून एसटीने २ कोटी ६१ लाख ३१ हजार ६४ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळविले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार २९१ किलोमीटरचा अधिक प्रवास एसटीचा झाला. यामुळेच उत्पन्नातही २३ लाख ७४ हजार ४९० रुपयांची वाढ झाली आहे. वारीच्या काळात सर्वाधिक उत्पन्न हे सोलापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाने मिळवले. तर सर्वात कमी उत्पन्न हे पंढरपूर आगाराचे आहे.