सोलापूर

MSRTC Bus: लालपरीचे लोकेशन कळणार मोबाईलवर

आपली एसटी ॲप; राज्यातील 12 हजार गाड्यांमध्ये यंत्रणा सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) व्यवस्थापनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी हे नवे मोबाइल ॲप सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या गावाला जाणारी एसटी बस कुठपर्यंत आली हे कळणार आहे. महामंडळाने आपल्या ताफ्यातील 12 हजारांपेक्षा जास्त बसेस व लाखाहून अधिक मार्गाचे मॅपिंग करून या नव्या यंत्रणेचे ॲप विकसित केले आहे.

राज्याचे परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ॲपला आपली एसटी हे मराठी नाव दिले आहे. कोव्हिडपूर्वीच बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे ठरले होते. ॲपच्या मदतीने बस कोणत्या थांब्यावरून सुटेल व एसटीची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांच्या ठिकाणापर्यंत यायला लागणारा वेळ कळेल. यामुळे जवळच्या बसथांब्याचा शोध घेणे व दोन थांब्यांच्या दरम्यान धावणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पाहता येईल. आरक्षित तिकिटावरील बस क्रमांकाद्वारे थेट बसचा मागोवा घेता येतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन क्रमांकाची माहितीही यात उपलब्ध आहे. एका क्लिकवर थेट कॉलही करता येणार आहे.

वेळापत्रक व थांब्याची माहिती मिळणार

एसटी बसच्या तिकिटावरील ट्रिप कोड ॲपमध्ये टाकताक्षणी बस कुठे आहे. याचे निश्चित ठिकाण कळेल. तसेच याच मार्गावरील अन्य गाड्या व त्या गाड्यांचे वेळापत्रक व थांब्याची माहितीही मिळण्यास मदत होईल. लालपरीच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जात आहे. परिवहन महामंडळाने 12 हजार बसेसमध्ये हे नवीन तंत्रज्ञान बसवले आहे. अन्य बसमध्येही बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT