सोलापूर

MSRTC News : प्रवाशांना पर्यटनाचा पास मिळणार एका क्लिकवर

चार व सात दिवसांचे पास ऑनलाईन; रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या आवडेल तेथे पर्यटनाचा प्रवास योजनेचा पास आता प्रवाशांना ऑनलाइन काढता येणार आहे. त्यामुळे पास मिळवण्यासाठी महामंडळाच्या बसस्थानकात जाण्याची व आरक्षणाच्या खिडकीसमोर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवाशांचा वेळ व श्रम यामुळे वाचणार आहेत. पर्यटकांना पर्यटनाचे नियोजन करणे सोपे होईल.

महामंडळाने या योजनेतील चार व सात दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळावरून आवश्यक माहिती भरूनही पास काढता येणार आहे. हा पास पीडीएफ स्वरूपात मोबाइलमध्ये जतन करता येणार आहे व आवश्यकतेनुसार त्याची प्रिंटही काढता येईल. पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची वैधता तपासण्याची सुविधा यात उपलब्ध आहे.

पर्यटन, धार्मिक यात्रा तसेच सलग अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. ऑनलाइन पासमुळे कागदी पास हरविण्याची किवा ती खराब होण्याची भिती नाही. चार आणि सात दिवसांच्या पासमुळे पर्यटन व धार्मिक यात्रेसाठी एसटीने प्रवास करणे सोयीचे होणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे पास काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.

येथे काढा ऑनलाईन पास

एसटीच्या या संकेतस्थळावरून पाससाठी अर्ज करता येईल. अडचण आल्यास १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, पास काढण्याची प्रक्रिया अधिक सोयीची होणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- नागेश जाधव, सहाय्यक अधिक्षक परिवहन महामंडळ सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT