सोलापूर

Pandharpur Extra Buses: विठूनामासाठी एसटीच्या २३५ जादा बसेसचा ताफा

पंढरपुरात चार बसस्थानके; ​वारकऱ्यांचा होणार सुखकर प्रवास, मदत केंद्राचीही उभारणी

पुढारी वृत्तसेवा

​सोलापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे वारकऱ्यांचा जनसागर लोटतो. विठ्ठल भक्तांसाठी परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने वारकरी भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, या हेतूने यंदा विभागातून २३५ जादा बसेस विविध मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपुरात तात्पुरत्या चार बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे. शहराबाहेरील प्रमुख मार्गांवर १२ तपासणी नाकेही तयार केले आहेत. बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वारकऱ्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये. यासाठी बसेसच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ब्रेकडाऊन पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. या अतिरिक्त उभारलेल्या यंत्रणेमुळे वारीच्या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

​एसटी प्रशासनातील सर्व अधिकारी, चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीची कामे आषाढीच्या वारी काळात २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना व दिव्यांग सवलती यांसारख्या शासनाच्या सर्व प्रवासी सवलती वारीच्या काळातही वारकऱ्यांना लागू राहतील.

पंढरपुरातील तात्पुरते बसस्थानक

चंद्रभागा : पुणे, सातारा, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई सेंट्रल, रत्नागिरी

भीमा : बीड, परभणी, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर व वर्धा

विठ्ठल : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर व धुळे

पांडुरंग : कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सांगोला

असे चार तात्पुरते बसस्थानक उभारले असून येथून राज्यभरात अन्य जिल्ह्यांसाठी बससेवा उपलब्ध असेल. यात पुणे, सातारा, मुंबई, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील अन्य शहरांचा समावेश असेल. हिरकणी कक्ष, जनरेटर, क्रेन सुविधा व आरक्षण केंद्र अशा सोयीसुविधाही तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानकांवर उपलब्ध करून दिल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT