अंजनगाव खेलोबा : अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. जोरदार वार्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासंतास अंधार पसरतो, अशा बिकट परिस्थितीत वायरमन आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटतात मात्र काम करत असताना सारखे वीज ग्राहकांचे फोन येत असल्याने ते वायरमनच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांकडून लाईट कधी येणार आहे हे विचारण्यासाठी असंख्य फोन कॉल वायरमनला येत असतात. वादळात तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे, खांब वाकणे अशा घटनांमुळे विजपुरवठा खंडित होत आहे. पावसात आणि वादळात धोकादायक परिस्थिती असताना वायरमनला खांबावर चढून काम करावे लागते. कधी कधी ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड असल्यास तिथेही काम करावे लागते. हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागते.
हे काम करत असताना अनेक वीज ग्राहक वायरमनला फोन करून वीज कधी येणार आहे असे विचारत असतात त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते अशा प्रसंगी ग्राहकांनी वायरमनला सहकार्य करून संयम बाळगणे अपेक्षित असते, त्यांच्या कामात सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे हे सर्वांनी मान्य करणे गरजेचे आहे.
पाऊस थांबताच आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचतो. खांबावर चढून वायर हाताळणे हे काम जीवावर बेतणारे असते. अशावेळी नागरिकांकडून सतत फोन येतात. आम्ही फोन उचलू शकलो नाही, तर काहींची नाराजी होते.मात्र फोन उचलण्याच्या घाईत अपघात होऊ शकतो. नागरिकांनी संयम बाळगावा.-अजित टिपे, वायरमन, अंजनगाव खेलोबा
माढा तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वादळी वार्यासह संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पोल पडतात किंवा तारा तुटत आहेत. त्यामुळे काम करताना वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. कामासंदर्भात लाइनमन दक्ष असून त्यांना वारंवार फोन करणे टाळावे, अन्यथा काम करताना त्यांच्या जीवावर बेतू शकते.-शिवम कांबळे, सहाय्यक अभियंता, माढा ग्रामीण भाग