MPSC exam: एमपीएससीच्या अंतिम परीक्षेची ‘अ‍ॅन्सर की’ जाहीर File Photo
सोलापूर

MPSC exam: एमपीएससीच्या अंतिम परीक्षेची ‘अ‍ॅन्सर की’ जाहीर

आता निकालाकडे लक्ष; गट-ब मुख्य परीक्षेत बारा प्रश्न रद्द, उमेदवारांना निकालाची चिंता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच गट-ब सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. या उत्तरतालिकेमुळे परीक्षार्थींमध्ये मोठी नाराजी पसरली आहे, कारण यात तब्बल 12 प्रश्न रद्द करण्यात आले असून, दोन प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्याने ही मोठी चूक उमेदवारांच्या निकालावर गंभीर परिणाम करू शकते. अनेक उमेदवारांचे भविष्य एका-एका गुणावर अवलंबून असते, त्यामुळे अशा चुकांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

मागील काही वर्षांपासूनच्या परीक्षांमध्ये वारंवार असे गोंधळ होत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये निकालाची चिंता वाढली असून, आता सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे. ही चूक टाळण्यासाठी आयोगाने अधिक काळजी घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

चुकीमुळे बसणार 28 गुणांचा फटका

गट-ब मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली असून, यामध्ये 12 प्रश्न रद्द करण्यात आले आहेत, तर दोन प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्याने या बदलांमुळे उमेदवारांच्या गुणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या चुकीमुळे सुमारे 28 गुणांचा फटका बसणार असल्यामुळे उमेदवार चिंतेत आहेत.

अशा आहेत चुका

या चुका विविध विषयांमध्ये आढळल्या. मराठी आणि गणित-बुद्धिमत्ता या विषयांमध्ये प्रत्येकी 3 प्रश्न रद्द झाले, तर रिमोट सेन्सिंग, भूगोल, इतिहास, पॉलिटी या विषयांत प्रत्येकी 1 प्रश्न रद्द झाला आहे. या व्यतिरिक्त, इंग्लिश विषयातील दोन प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा स्पष्टीकरण

रद्द प्रश्नांचे गुण मिळण्याची उमेदवारांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-ब मुख्य परीक्षेत रद्द झालेल्या 12 प्रश्नांचे गुण वगळून, उर्वरित प्रश्नांच्या आधारे निकाल लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण सर्वांना दिले जावेत, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

प्रश्नपत्रिका तयार करताना बारीक चुका टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. यामुळे उमेदवारांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम कमी होईल. यासोबतच, रद्द झालेल्या प्रश्नांचे वाढीव गुण देऊन लवकर निकाल जाहीर करावी.
- प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT