सचिन तटाळे
भोसे : सध्या देशावरती एल लिनोचे संकट आहे, हे माहीत असतानासुद्धा शासनाने मागील दोन महिन्यांपासून दुष्काळाचे नियोजन केले नाही. लोकांची होणारी वणवण, चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल थांबवायला पाहिजेत. या आधीच पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा डेपो चालू करायला पाहिजे होते. परंतु, या सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे, असा हल्लाबोल खा. प्रणिती शिंदे यांनी केला.
सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे या सध्या मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यावर आहेत. भोसे येथील दुष्काळ भागाची त्यांनी पाहणी केली. येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंगळवेढा रोडवरील प्रतीक कोपे यांच्या लिंबू बागेची पाहणी केली. बाग पाण्याअभावी पूर्ण जळाली आहे. या बागेसाठी त्यांनी ७० हजार रुपये खते व औषध फवारणीसाठी खर्च केला. फुलकळी निघाल्यानंतर पाणी कमी पडल्यामुळे पूर्णपणे बाग जळून गेली आहे.
शेतकरी कर्जमाफी होऊनसुद्धा बँकेतील अधिकारी कर्जाचा ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार कुमार कोपे यांनी केली. सध्या जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न असून लवकरात लवकर चारा डेपो चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत कांतीलाल ताटे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, ॲड. रविकिरण कोळेकर, आण्णा क्षीरसागर, बन्सीलाल खडतरे, अण्णासाहेब खडतरे, रमेश कोपे, प्रतीक कोपे, वसंत जोध, समाधान खडतरे, पप्पू चौगुले, संदीप पवार, सचिन जाधव, उमेश काटकर, श्रीशैल्य कोपे आदी उपस्थित होते.