सोलापूर : सोलापूरच्या खासदार मॅडमला संस्कार शिकवण्याची गरज आहे, असा टोला आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला काळा दिवस संबोधल्याने आमदार सुभाष देशमुख यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, याची सुरुवात करण्यासाठी ते होटगी येथील साई मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यासाठी आले होते. यावेळी आ. देशमुख बोलत होते.
कोणाचाही वाढदिवस असला, कोणत्याही पक्षाचा कितीही विरोधक असला की त्या काळात त्याला वाढदिवसाला शुभेच्छा देणं हा संस्काराचा भाग आहे. सोलापूरच्या खासदारांना त्यांच्या परिवाराकडून, त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर दुर्भाग्याने संस्कार झाले नसतील म्हणून असे वक्तव्य येत आहेत. जे पोटात आहे ते आता ओठावर येत आहे. माणूस संस्कारयुक्त असायला पाहिजे; मात्र आता त्या संस्कारमुक्त दिसत आहेत. संस्कारहीन खासदार आमच्या सोलापूरला मिळाल्या आहेत, हे आमचे दुर्भाग्य असल्याचे मत आमदार देशमुख यांनी व्यक्त केले.