मंगळवेढा : निसर्गाचा लहरीपणा आणि नियतीचा क्रूर घाला काय असतो, याचा प्रत्यय शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाला आला. आईसोबत गावाजवळील साठवण तलावाजवळ जळण आणायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर अचानक काळाने झडप घातली. जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. वैशाली अनिल घोडके (वय 35) या श्रेया (वय 12) आणि सोहम (वय 10) अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी चार वाजता वैशाली या श्रेया आणि सोहम या दोन मुलांसह गावाजवळील साठवण तलावाजवळ जळण आणायला गेल्या होत्या. सोबतची दोन्ही मुले खेळत मासे पकडण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यांना तलावाचा अंदाज आला नाही व ते पाण्यात बुडाले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात वैशालीदेखील पाण्यात बुडाल्या. एका हसत्या खेळत्या कुटुंबातील तीन जीव नियतीने हिरावून नेले.
दरम्यान, ते तिघे घराकडे अद्यापही कसे आले नाहीत, हे पाहण्यासाठी पतीने तळ्याकडे धाव घेतली असता, त्यांना तिथे बादल्या व त्यात मासे आढळून आले. पाण्यात काहीतरी घडले असावे, असे वाटल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात कळवले. मंगळवेढा पोलिसांनी, ग्रामस्थांनी सुरुवातीला शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा वैशालीचा मृतदेह पाण्यात आढळला. मात्र, शनिवारी सकाळी पंढरपूर येथील विशेष रेस्क्यू टीमला दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. आईसह श्रेया आणि सोहम या दोन्ही भावंडांचा असा करुण अंत झाल्याने घोडके कुटुंबावर आभाळ फाटलं आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना साठवण तलाव, विहिरी आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आणि लहान मुलांना सोबत नेणे टाळण्याचे आवाहन केले आहे.