पोखरापूर : मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे दत्तात्रय खवळे विजयी झाले. हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत त्यांना 11 मते पडली तर शिवसेनेचे लखन कोळी यांना 10 मते पडली. विजयानंतर नूतन उपनगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला.
मोहोळ नगरपरिषदेत भाजपाचे 11 नगरसेवक विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासह 9 उमेदवार विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचा एक महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. शुक्रवारी मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी मुख्यधिकारी डॉ. योगेश डोके उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने उपनगराध्यक्षपदासाठी प्रभाग क्र. 4 मधून भाजपातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या नगरसेवक दत्तात्रय खवळे यांना संधी दिली. त्यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक लखन कोळी यांचा उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता.
यामध्ये भाजपाकडून गटनेते सतीश काळे, रूपेश धोत्रे, प्रमोद डोके, शाहिस्ता परवीन शेख, उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार दत्तात्रय खवळे, सरिता सुरवसे, अझरुद्दीन कुरेशी, विक्रम फडतरे, भारती बरे, शहनाज तलफदार, आरती गाढवे अशा 11 जणांनी हात उंचावून उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत मतदान केले. नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे, रमेश बारसकर, अजय कुर्डे, उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार लखन कोळी, चेतन देशमुख, सरताज सय्यद, राणी गोडसे,साखरबाई बरकडे, सपना अष्टूळ व स्वप्नाली जाधव अशा दहा नगरसेवकांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. यामध्ये एक मत जास्त असल्याने भाजपाचे दत्तात्रय खवळे हे विजयी झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.