मोहोळ : शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि बाजारपेठ परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय होत असताना, आता प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. मोहोळ पोलिस, नगरपरिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून सुरू असलेल्या या कारवाईला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, शहरातील अनेक रस्ते अतिक्रमणमुक्त होऊ लागले आहेत.
पोलिस ठाणे ते बुधवार पेठ चौक या मार्गावर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले विविध प्रकारचे अडथळे तसेच अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या. विशेष म्हणजे, कारवाई सुरू होण्यापूर्वीच अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपापल्या टपऱ्या व अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले.
मोहोळ शहरातून जाणाऱ्या सोलापूर-पुणे महामार्ग, पंढरपूर पालखी महामार्ग, बसस्थानक परिसर तसेच शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढला होता.
अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्यांची रुंदी पूर्ववत झाल्याने वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र, हटविलेले अतिक्रमण पुन्हा उभे राहू नये, यासाठी नियमित पाहणी आणि कायमस्वरूपी कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक दीपक पाटील, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील उर्वरित अतिक्रमणेही टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे रस्ते मोकळे झाले असले तरी आता कारवाईची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होते का, याकडे मोहोळकरांचे लक्ष लागले आहे.