पोखरापूर : मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रारूप प्रभाग रचनेला 21 हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतीवर निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाली. मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 5 व 8 साठी हरकती घेण्यात आल्या होत्या.
18 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्दकरण करण्यात आले. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर 31 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मोहोळ नगरपरिषदेच्या नव्याने झालेल्या प्रभाग 1 ते 5 व 8 साठी 21 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या हरकत्यांची सुनावणी 3 सप्टेंबर रोजी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निर्हाळी यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी मोहोळ नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके उपस्थित होते. त्यावेळी 21 हरकतदारांपैकी 14 जण उपस्थित होते तर 7 जण गैरहजर होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, भारत नाईक, अतुल क्षीरसागर, सुहास आखाडे, सुरज गायकवाड, धीरज गायकवाड, निलेश लोंढे आदींनी घेतलेल्या हरकतीबाबत उपजिल्हाधिकार्यांसमोर आपली बाजू मांडली. इन कॅमेरा झालेल्या सुनावणीनंतर दि. 26 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान नगरपरिषदांची व नगरपंचायतीची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. आता अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुक उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्र. 1 ला पंढरपूर रस्त्यावरील डाव्या उजव्या बाजूचा परिसर जोडण्यात आला आहे. मात्र, त्या परिसरातील यशवंतनगर, संभाजीनगर, कोर्ट परिसर हा भाग प्रभाग क्र. 8 ला चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आला आहे. भौगोलिक सलगता तोडण्यात आलेली आहे. या संदर्भात हरकत दाखल केली होती. अंतिम प्रभाग रचनेत बदल न झाल्यास न्यायालयात जाणार आहे.- सतीश काळे, तालुकाध्यक्ष, भाजपा