मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार राजू खरे यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा असून, मोहोळ तालुक्यातील १०४ गावे, उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावे आणि पंढरपूर तालुक्यातील १७ गावांचा त्यात समावेश आहे. या भागातील अनेक गावांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध कामांचा बॅकलॉग निर्माण झाला आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार खरे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे, गावांमधील मूलभूत पायाभूत सुविधा, ग्रामविकासाची विविध कामे, आरोग्य सुविधा बळकट करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुधारणा करणे आणि शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मोहोळ शहराच्या भविष्यातील विकासाबाबतही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत मोहोळचा नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी विविध विकासकामांना निधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले.