bahava tree bloom Pudhari
सोलापूर

Mohol news: मोहोळमध्ये रखरखत्या उन्हात फुलला बहावा

रस्त्याकडेला पिवळ्या फुलांनी बहरलेली फुले लक्षवेधक

पुढारी वृत्तसेवा
रमेश दास

मोहोळ : चैत्राचे आगमन झाले की, निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. त्यातही पिवळ्या धमक फुलांच्या लडींनी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच. मोहोळ शहरातील कुरूल रस्त्याकडेला पिवळ्या फुलांनी बहरलेला बहावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सदाहरित तसेच वर्षांवनात आढळणारी पानझडीची भारतीय वनस्पती. (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव.भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. त्याची उंची साधारणपणे 40 फुटांपर्यंत असू शकते. बहाव्याच्या खोडाचा रंग पांढरट असतो. बहाव्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. प्रत्येक फुलाला 5 पाकळ्या असतात. फुलांचे घोस झाडावर अशा प्रकारे लटकलेले असतात की, जमिनीकडे झुकलेले ते फुलांचे घोस जणू पिवळ्या रंगाचे झुंबर झाडाला लटकावे तसे ते दिसतात.

फुलांच्या गुच्छांत कळ्या आणि फुले असे दोन्ही पाहायला मिळतात. या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्यापासून पिवळा रंग तयार करता येतो. या पाकळ्यांना मंद सुगंध असतो. याचा पिवळा रंग मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतो. याच्या सुंदर पिवळ्या फुलांमुळे याची शोभेची वनस्पती म्हणून लागवड केली जाते. दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात.

केरळ या राज्याचे राज्यफूल ‌‘बहावा‌’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे. बहाव्याच्या पानांचा रंग गडद हिरवा असून ती संयुक्त प्रकारची असतात. हा पानगळीचा वृक्ष असल्यामुळे साधारण फेब्रुवारीपासून पानगळीला सुरुवात होते. साधारण सरता मार्च आणि एप्रिल मध्ये या निष्पर्ण वृक्षावर पिवळ्या धमक फुलांच्या लडी उमलायला सुरुवात होते. बघता बघता संपूर्ण झाड पिवळे धमक होऊन जाते.

रस्त्यावरुन येणा-जाणाऱ्या प्रवाशांना थोडं थांबून मोबाईलच्या कॅमेऱ्यात फोटो किंवा सेल्फी घ्यायचा मोह आवरत नाही. बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या बनविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. सरपणासाठीही हे लाकूड वापरले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT