मोहोळ :मोहोळ तालुक्यातील कोळेगाव शिवारातील नक्षत्र लॉजवर मोहोळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कथित देहव्यापार प्रकरण उघडकीस आले असून, लॉजचा चालक आण्णा किसन चवरे (रा. वडवळ, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास नक्षत्र लॉज, कोळेगाव शिवार येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान एका २६ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी आण्णा किसन चवरे याने संबंधित लॉजचा कथितपणे कुंटणखान्यासारखा वापर करून पीडित महिलेला कामाचे आमिष दाखवत लॉजवर बोलावून घेतले. त्यानंतर तिला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा तसेच तिच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४(२) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ अन्वये गुन्हा क्रमांक ७३३/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक दासरी तसेच गजानन माळी, रहीमन शेख, संदीप पाटील, संदीप सावंत, अमोल जगताप, अनिल वाघमारे आदी पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन सुनावणी होणे बाकी असून, आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.