मोहोळ शहर : मोहोळ शहरातील मांडवे वस्ती येथे विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा सुमारे ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत विनालेबल सुगंधित तंबाखूची ६०० पाकिटे आणि ३३२० गुडकू सुगंधित तंबाखूची ५६० पाकिटे, अशी एकूण १ हजार १६० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सुधाकर प्रभू मांडवे (रा. मांडवे वस्ती, मोहोळ) यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास मांडवे वस्ती येथे हा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा विक्रीच्या उद्देशाने साठा केल्याचा आरोप संबंधित आरोपीवर करण्यात आला आहे.
या कारवाईत विनालेबल पिवळ्या रंगाच्या सुगंधित तंबाखूची पाच पोती आढळली. प्रत्येक पोत्यात १२० पाकिटे असून, एकूण ६०० पाकिटांची किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. तसेच ३३२० गुडकू सुगंधित तंबाखूची सात पोती जप्त करण्यात आली. प्रत्येक पोत्यात ८० पाकिटे असून, एकूण ५६० पाकिटांची किंमत २ लाख २४ हजार रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या तंबाखूचा एकूण ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी अशोक यमनप्पा इलागेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करीत आहेत.