मोडनिंब : मोडनिंब (ता. माढा) येथे प्रस्तावित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी प्रकल्पाबाबत 'पास थ्रू' पद्धतीविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत, या निर्णयाचा फेरविचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
सोलापूर दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांची सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा भाजप नेते रणजितसिंह शिंदे व माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायततर्फे निवेदन देऊन, शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या भावना उद्योगमंत्र्यांसमोर मांडत 'पास थ्रू' पद्धतीऐवजी जमीन अधिग्रहण कायद्यानुसारच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी व 'पास थ्रू'चा झालेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत या विषयाची गंभीर दखल घेतली. शेतकऱ्यांच्या हिताला कोणताही धक्का लागू दिला जाणार नाही. 'पास थ्रू' संदर्भातील निर्णय रद्द झाला असे समजा, असेे आश्वासन त्यांनी रणजितसिंह शिंदे यांना दिले.
युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, तर महिलांसाठीही विविध उद्योग, सेवा क्षेत्र आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. परिणामी मोडनिंब व परिसराच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय एमआयडीसीमुळे पूरक उद्योग, वाहतूक, व्यापारी उलाढाल आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, औद्योगिक नकाशावर सोलापूर जिल्ह्याची व मोडनिंब शहराची नवी ओळख मिळण्यास मदत होईल. असे मत भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांनी मांडले.
यावेळी भाजप नेते रणजितसिंह शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, गोरख देशमुख, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास तोडकरी, राहुल पाटील, माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे, मोडनिंब भाजप अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस धनाजी लादे, बाळासाहेब पवार, विकास शिंदे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.