Dr.Babasaheb Ambedkar statue Pudhari
सोलापूर

Dr.Babasaheb Ambedkar statue: मोडनिंबमध्ये बसविला डॉ. आंबेडकरांचा पुतळा

पुतळा परिसराला पोलिस बंदोबस्त, गावात शांतता

पुढारी वृत्तसेवा

मोडनिंब : मोडनिंब शहरात ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत अनोळखी व्यक्तींनी बुधवार पहाटे एकच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला. पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गावात शांतता आहे. काही दिवसांपूर्वी याच जागेशेजारी अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता.

संबंधित पुतळा विना परवानगी उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सकाळपासून परिसरात पुतळा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. जय भीम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करून मानवतेचा, समतेचा आणि सत्याचा संदेश दृढ केला.

करमाळा पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम, कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, टेम्भूर्णीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने उपस्थित होते.पहाटेपासूनच दंगल नियंत्रण पथक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT