pudhari photo
सोलापूर

Solapur News: वीज खंडित करणे चुकीचे

महावितरणने कारवाई त्वरीत रद्द करण्याची मनसेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांची एक महिन्याच्या थकबाकी वर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कारवाई तत्काळ रद्द करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाप्रमुख संजय घोलप यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीकडून नागरिकांची होत असलेल्या पिळवणुकीविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा उघडला आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांचा भंग करत, केवळ 30 दिवसांच्या थकबाकीवर वीज कनेक्शन खंडित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केला आहे.

नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना देण्यात आलेल्या आश्वासनाला केराची टोपली दाखवली आहे. नवीन सिमकार्ड असलेली स्मार्ट मीटर बसवल्याने मीटर वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पैसा वाचणार असून वीज वापरणाऱ्यांना याचा फायदा होऊन वीज बिल कमी होईल असे आश्वासन दिले होते मात्र वेळेवर वीज बिल येईल, वीज बिल कमी येईल अशी आशा करणाऱ्याला मात्र या वितरण कंपनीने धक्का दिला असून एक महिना विज बिल थकले की लगेच वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. याबाबत बिल थकल्यास केवळ 30 दिवसांत कनेक्शन कापले जाईल, अशी कल्पना ग्राहकाला दिली नव्हती.

सध्याच्या महागाईच्या काळात, सरकारी कर्मचारी, शेतकरी, सर्वसामान्यांची आर्थिक उलाढाल मंद गतीने होत आहे. अनेक लोक हे हातावरील पोट असणारे आहेत. अशा परिस्थितीत केवळ एका महिन्याच्या थकबाकीवर वीज कनेक्शन तोडणे म्हणजे गोरगरीबांना विजेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ही अट इंग्रजांच्या काळातील जाचक कायद्यांप्रमाणे असून, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याप्रश्नी लवकरच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले जाईल. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसैनिक राज्यभर रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT