वेळापूर : माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांचा 45 वर्षांचा पाण्यासाठीचा वनवास लवकर संपला पाहिजे. यासाठी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी डोक्याला मुंडासे बांधून अंगात शर्ट घालून पायात कातडी चप्पल परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विधिमंडळाच्या पायरीवर राज्य सरकारचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसर्या आठवडा सुरू आहे. यानिमित्ताने आ. उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील कायम दुष्काळी असणार्या 22 गावांना त्यांच्या हक्काचे नीरा-देवधर धरणातील पाणी 31 डिसेंबर 2025 पूर्वी मिळाले पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली. यासाठी अर्थसंकल्पीय व पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला सातत्याने दुष्काळी असणार्या 22 गावांमधील शेतकर्यांची करूण कहाणी समजण्यासाठी, या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साध्या शेतकरी पेहरावामध्ये सरकारकडे आग्रही मागणी केली.
यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन माळशिरस मतदारसंघातील शेतकर्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काचे पाणी देऊन न्याय देण्याची मागणी आमदार जानकर यांनी विधिमंडळाच्या पायरीवरती बसून केली.