मिरज : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. महामार्गावर विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीची व आमदार गाडगीळ यांच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या भीषण अपघातात गाडगीळ यांच्या वाहनासह दुचाकीचा चक्काचूर झाला. तसेच, गंभीर जखमी झालेल्या भारत पांडुरंग कोळी (वय ५६, रा. शिरोळ) यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी चालक गणपती विजय दरेकर यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमदार सुधीर गाडगीळ हे कर्नाटकातील उगार खुर्द येथे कामानिमित्त गेले होते. त्यांची मोटार नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ आली. यादरम्यान ढवळी (ता. मिरज) येथे शिक्षक म्हणून काम करणारे भारत कोळी हे त्यांच्या दुचाकीवरून शिरोळकडे निघाले होते.
परंतु, रस्ता चुकल्याने ते राष्ट्रीय महामार्गावर अर्जुनवाड फाट्यापासून थोडे पुढे गेले. यामुळे अर्जुनवाडमार्गे जाण्यासाठी ते महामार्गावर विरुद्ध दिशेने वेगाने येत होते. यावेळी कोळी यांच्या दुचाकीची आमदार गाडगीळ यांच्या मोटारीशी समोरासमोर जोरदार धडक झाली.