करमाळा : उजनीवरील एआय डाटा सेंटरसह चार प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या भावना आमदार नारायण पाटील यांनी जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्यासमोर मांडल्या. दुष्काळी परिस्थिती, दहिगाव योजना, कुकडीच्या पाणी संदर्भात चर्चा झाली असून याबाबत मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार नारायण पाटील उपस्थित होते.
याबाबत आ. पाटील यांनी सांगितले की, करमाळा मतदार संघातील सिंचनाचा प्रश्न, दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय लक्षात घेऊन कुकडी आवर्तन चालू असताना दिवस वाढवून मांगी तलावातही कुकडीचे पाणी दिले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे.
उपाययोजना करण्याचे मंत्र्यांचे आश्वासन
उजनीवरील तरंगता सौर उर्जा प्रकल्प तसेच एआय डाटा सेंटरसह इतर प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांचा विरोध आहे. उजनी धरणग्रस्त व मच्छीमार यांचेही दीर्घकाळ नुकसान होणार असल्याचे सांगितले. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम निधीअभावी अजून सुरू झाले नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत त्यांनी लवकरच उपाययोजना करू, असे आश्वासन दिल्याचे आ. नारायण पाटील यांनी सांगितले.